रत्नागिरी : राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले ‘मनाचे श्लोक’ हे केवळ पाठांतरासाठी नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, शिस्त आणि सुसंस्कार घडविणारे
रत्नागिरी : राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन


रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले ‘मनाचे श्लोक’ हे केवळ पाठांतरासाठी नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, शिस्त आणि सुसंस्कार घडविणारे जीवनमंत्र आहेत. या विचारातून समर्थ भारत अभियानतर्फे राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध गट ठेवण्यात आले आहेत. तसेच पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खुला गट आहे. सहभागींसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये असून प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शाळास्तरावरच स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून राज्यस्तरीय अंतिम फेरी ३१ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

आजच्या तंत्रज्ञानप्रधान आणि धकाधकीच्या जीवनशैलीत मुलांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण व्हावा, तसेच ज्येष्ठ नागरिकांना मानसिक समाधान, सकारात्मकता आणि आध्यात्मिक आधार मिळावा, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.

ज्या शाळा किंवा संस्थांपर्यंत समर्थ भारत अभियानाचे कार्यकर्ते अद्याप पोहोचले नसतील, त्यांनी स्पर्धेची माहिती, नोंदणी प्रक्रिया अथवा नियमावली जाणून घेण्यासाठी २५ जुलैपर्यंत माया तांबे (9545235225), सौ. पर्णिका मुळे (9763134574) किंवा पल्लवी मेहेंदळे (9819565556) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिकांनी या संस्कारमय उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तो यशस्वी करावा, असे आवाहन रत्नागिरी विभाग प्रमुख डॉ. सौ. निशिगंधा पोंक्षे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande