
सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)। केंद्र सरकारने ग्रामीण भागातील मजुरांना 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्याच्या उद्देशाने 1 जुलैपासून 'व्ही. बी. रामजी' या नव्या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, योजना सुरू झाल्यानंतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक मजुरांना मागील 17 दिवसांपासून रोजगारापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
यापूर्वी ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जात होता. 1 जुलैपासून या योजनेत बदल करून 'व्ही. बी. रामजी' या नावाने नवीन योजना सुरू करण्यात आली असून, रोजगाराची हमी 125 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच मजुरीच्या दरात प्रति दिवस पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, नव्या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. सध्या हजेरीपत्रकात ज्या लाभार्थ्याच्या नावावर काम मंजूर आहे, त्याचेच नाव दिसत आहे, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या इतर मजुरांची नावे प्रणालीमध्ये दिसत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.
यामुळे अनेक मजुरांना कामावर हजर राहूनही अधिकृत हजेरी लागत नसल्याने त्यांना रोजगार मिळत नाही. परिणामी, गेल्या 17 दिवसांपासून अनेक ग्रामीण मजूर बेरोजगार असून, ही तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून सर्व पात्र मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड