परभणी आगारात 35 ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल
परभणी, 20 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 35 अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना सुरक्षित,
परभणी आगारात 35 ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ


परभणी, 20 जुलै (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 35 अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर बससेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

परभणी आगारासाठी 100 ‘राजमाता जिजाऊ’ बस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 35 बस उपलब्ध झाल्या असून उर्वरित बसही लवकरच मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.

नवीन बससेवेच्या शुभारंभामुळे परभणी बसस्थानक परिसरात तसेच विविध मार्गांवरील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी महापौर सय्यद इक्बाल, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे यांच्यासह परिवहन विभागाचे उपविभागीय नियंत्रक सोळंके, गणेश भोसले, रेवनवार यांच्यासह विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी नव्या बससेवेचे स्वागत करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande