
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)। आषाढी पंढरीच्या वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी सोलापूर जिल्ह्यात दाखल होत असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनची तैनाती करण्यात आली असून, त्याचा सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रभावी वापर केला जात आहे.
पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर धर्मपुरी सीमा ते नातेपुते या मुख्य पालखी मार्गावर ड्रोनद्वारे सातत्याने निगराणी ठेवली जात आहे. या माध्यमातून गर्दीची स्थिती, पालखी मार्गावरील हालचाली आणि वाहतुकीची परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ झाले आहे.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील गर्दीवर सतत लक्ष ठेवून सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली आहे.
महामार्ग आणि पालखी मार्गावरील वाहतूक कोंडी तात्काळ ओळखून पर्यायी मार्गांचा वापर करण्यास मदत होत आहे.
वाहतूक सुरळीत ठेवल्यामुळे पालखी सोहळा आणि वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि विनाअडथळा होत आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या आधुनिक उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांकडून स्वागत होत असून, आषाढी वारीच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड