
रायगड, 20 जुलै (हिं.स.)। : सावित्री खाडीवरील आंबेत–म्हाप्रळ पुलाला धडक देणाऱ्या बार्ज मालकाविरुद्ध अखेर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित बार्जचा पंचनामाही पूर्ण करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.
पूल धडक प्रकरणानंतर दोन्ही जिल्ह्यांतील वाहतुकीवर परिणाम झाला होता. दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांच्या नेतृत्वाखाली १६ जुलै रोजी म्हसळा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाईची लेखी हमी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
तक्रार दाखल होऊनही गुन्हा नोंदविण्यात विलंब होत असल्याने अझहर धनसे यांनी प्रशासनाला २८ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम देत जनआंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर १७ जुलै रोजी बार्ज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तर १८ जुलै रोजी संबंधित बार्जचा पंचनामा करण्यात आला.
अझहर धनसे यांनी ही कारवाई जनतेच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच सावित्री नदीपात्र व खाडी परिसरात नियमबाह्य काम करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही दिला. या कारवाईमुळे आंबेत–म्हाप्रळ पूल धडकप्रकरणातील तपासाला वेग मिळाला असून दोषींवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)