
पीडीएमसी रुग्णालयात झाले यशस्वी किडनी प्रत्यारोपण
अमरावती, 20 जुलै (हिं.स.) : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या पतीला पत्नीने स्वतःची किडनी दान करून जीवनदान दिल्याची हृदयस्पर्शी घटना अमरावतीतील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) रुग्णालयात घडली. या रुग्णालयात आणखी एका किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या पार पडली.
शहरातील सामान्य कुटुंबातील अमन संतोष गोयर हे गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. शहरातील डॉ. अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार सुरू असताना त्यांना किडनी प्रत्यारोपण हा प्रभावी उपचार असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर अमन यांच्या 32 वर्षीय पत्नीने पतीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी स्वतःची किडनी दान करून पतीला नवजीवन दिले. या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनीही संमती दिली.
पीडीएमसी रुग्णालयात झालेली ही शस्त्रक्रिया चार ते पाच तास चालली आणि ती यशस्वी झाली. या किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन टेकाडे आणि डॉ. सोमेश्वर निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
युरोलॉजिस्ट डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ. अक्षय बोराडे, डॉ. अविनाश चौधरी यांच्यासह भूलतज्ज्ञ व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी