
रायगड, 20 जुलै (हिं.स.)। : वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधने, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार व्यवस्थेवर वाढणारा ताण कमी करण्यासाठी कुटुंब नियोजनाबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. रायगड जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात लोकसंख्या स्थिरता सप्ताह विविध जनजागृती उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे यांच्या उपस्थितीत झाले.
प्रास्ताविकात प्रतिम सुतार यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचा इतिहास आणि लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्र्य, बेरोजगारी, अन्नटंचाई व पर्यावरणीय समस्यांमध्ये वाढ होत असल्याने कुटुंब नियोजनाचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. किरण शिंदे यांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजनाच्या विविध योजना, जनजागृती अभियान आणि मोफत साधनांची माहिती दिली. डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी लहान परिवार, सुखी परिवार ही संकल्पना स्वीकारून निरोगी समाज घडविण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. निशिकांत पाटील यांनी दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर हा संदेश देत मातृ व बाल आरोग्यासाठी दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)