छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे लातूर जिल्ह्यात २२ जुलैपासून आयोजन
लातूर, 20 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये २२ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाध
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  अभियान


लातूर, 20 जुलै (हिं.स.)।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये २२ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतच्या तारखा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.

या शिबीराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी स्वीकारणे, विविध प्रमाणपत्रे वाटप करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभ मंजूर करणे, ई-केवायसी करणे, नवीन व दुय्यम डिजिटल शिधापत्रिका देणे, पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे, फार्मर आयडी देणे, डिजिटल सातबारा वाटप करणे, विमुक्त भटक्या जाती-जमातींसाठी प्रमाणपत्रे वाटप करणे, आभा कार्ड वाटप करणे, मोजणी विषयक अर्ज स्वीकारणे व मोजणी शीट (क-प्रत) वाटप करणे तसेच आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावत करणे यांसारख्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या म्हणजेच आरोग्य, कृषी, जिल्हा परिषद, भूमी अभिलेख आणि नगरपालिका प्रशासन विभागाच्या योजनांचे लाभ व सेवा हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात २२ जुलै, २०२६ रोजी रेणापूर येथील रेणुकाई मंगल कार्यालय येथे; उदगीर विधानसभा मतदारसंघात २२ जुलै, २०२६ रोजी उदगीर तालुक्यातील लोहारा शिवशंकर मंगल कार्यालय येथे; निलंगा विधानसभा मतदारसंघात २२ जुलै, २०२६ रोजी निलंगा येथील केतकी मंगल कार्यालय येथे; औसा विधानसभा मतदारसंघात २२ जुलै, २०२६ रोजी किल्लारी येथे; लातूर शहर विधानसभा मतदारसंघात २४ जुलै, २०२६ रोजी लातूर येथील पार्वती मंगल कार्यालय येथे आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ३१ जुलै, २०२६ रोजी अहमदपूर येथील सावता माळी मंगल कार्यालय येथे शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व शिबीरांचा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande