
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील महत्त्वपूर्ण दुसरे गोल रिंगण मंगळवार, दि. २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता खुडूस फाटा (पानीव पाटी) येथे पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर खुडूस ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन आणि सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात पूर्ण केली आहे.शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा गोल रिंगण सोहळा ज्योतीराम वाघ आणि जयवंत सिद यांच्या जागेत भरविण्यात येतो. पालखी मार्गावरील हा सोहळा वारकरी, भाविक आणि परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असून, दरवर्षी हजारो भाविक माऊलींच्या दर्शनासह रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी येथे उपस्थित राहतात.रिंगणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने रिंगणस्थळाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन, भाविकांसाठी मूलभूत सुविधा आणि स्वागताची तयारी केली आहे. पालखी मार्गावर विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नटला आहे.‘संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ या संतवचनानुसार पंचक्रोशीतील ग्रामस्थ वारकरी आणि भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. विविध ठिकाणी महाप्रसाद व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, सेवाभावी वृत्तीने ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.माऊलींच्या पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करताना रिंगण सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्याची माहिती संबंधितांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड