
बीड, 20 जुलै (हिं.स.)।
मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.
या शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांना मोफत तपासणी, निदान, उपचार व विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळणार आहे. रुग्णांची यादी तयार करण्यासाठी आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात येणार असून व्यापक जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.
🔹 शिबिराचे तीन टप्पे राबविण्यात येणार आहेत –
✅ रुग्णांची यादी तयार करणे
✅ नवीन रुग्णांची तपासणी व निदान
✅ ६ व ७ ऑगस्ट रोजी मुख्य महाआरोग्य शिबिर
मुख्य शिबिरात नेत्र, हृदय, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोग, दंतरोग, त्वचारोग, मानसिक आरोग्य, मूत्रपिंड, श्वसन, नाक-कान-घसा, फिजिओथेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी, कृत्रिम अवयव, रक्त संकलन तसेच इतर अनेक तज्ज्ञ विभागांची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis