महावितरणचा विद्युत खांब धोकादायक अवस्थेत ; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रायगड, 20 जुलै (हिं.स.) : नेरळ-खांडा पुलावरील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)चा विद्युत खांब अत्यंत धोकादायक अवस्थेत असून त्याचा पाया पूर्णपणे खचल्याने खांब रस्त्याच्या दिशेने झुकला आहे. विशेष म्हणजे या खांबावरून अद्यापही वीजपुरवठा सुरू
Electric pole standing on a collapsed base; Is Mahavitran waiting for a disaster?


Electric pole standing on a collapsed base; Is Mahavitran waiting for a disaster?


रायगड, 20 जुलै (हिं.स.) : नेरळ-खांडा पुलावरील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)चा विद्युत खांब अत्यंत धोकादायक अवस्थेत असून त्याचा पाया पूर्णपणे खचल्याने खांब रस्त्याच्या दिशेने झुकला आहे. विशेष म्हणजे या खांबावरून अद्यापही वीजपुरवठा सुरू असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा खांब कधीही कोसळू शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नेरळ-खांडा पूल हा नेरळ शहराला खांडा परिसराशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असून या पुलावरून दररोज हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, नोकरदार, व्यापारी तसेच नेरळमार्गे माथेरानकडे जाणारे देश-विदेशातील पर्यटक प्रवास करतात. त्यामुळे पुलावरील झुकलेल्या विद्युत खांबामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खांबाचा पाया आणखी खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जोरदार वारे, पावसाचा मारा किंवा मोठ्या वाहनांच्या कंपनामुळे हा खांब कोसळल्यास वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच विद्युत तारा तुटून गंभीर अपघात घडू शकतो. विशेषतः शाळा-कॉलेजच्या वेळेत आणि पर्यटन हंगामात या मार्गावर मोठी गर्दी असल्याने धोका अधिक वाढला आहे.

स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून खांबाची अवस्था धोकादायक असूनही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित खांबाला तातडीने आधार देऊन सुरक्षित करावे, त्याचा पाया मजबूत करावा किंवा आवश्यक असल्यास नवीन विद्युत खांब उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीविताशी संबंधित या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन युद्धपातळीवर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande