
परभणी, 20 जुलै (हिं.स.)।
पाथरी तालुक्यातील बाभळगाव, वाघाळा, विटा, रेणापूर, पाथरी आणि हादगाव या वीज उपकेंद्रांअंतर्गत येणार्या गावांमध्ये सुरू असलेले चुकीचे व अन्यायकारक वीज लोडशेडिंग तात्काळ बंद करून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, पाथरी तालुकाप्रमुख हरिभाऊ वाकणकर आणि लोणीचे उपसरपंच रामा गवारे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना आपल्या मागण्या संदर्भातील निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, पाथरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीज वितरणाबाबत मनमानी कारभार सुरू असून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि महिलांना त्याचा मोठा फटका बसत आहे. प्रभावित गावांमध्ये बाभळगाव उपकेंद्रांतर्गत लोणी, कान्सूर, कान्सूर वस्ती, टाकळगव्हाण तांडा, लोणी तांडा, सुरताबाई तांडा, मंजुळा तांडा, तुरा, तुरा तांडा, जैतापूरवाडी, समर्थनगर, वाघाळा उपकेंद्रांतर्गत चाटे पिंपळगाव व सारोळा, विटा उपकेंद्रांतर्गत विटा, रेणापूर उपकेंद्रांतर्गत बाबुलतार व बाबुलतार तांडा, पाथरी उपकेंद्रांतर्गत बांदरवाडा, खेडुळा, खेर्डा तसेच हादगाव उपकेंद्रांतर्गत वडी, निवळी, पाटोदा व पाटोदा वस्ती या गावांचा समावेश आहे.
सध्या संबंधित गावांमध्ये पहाटे 3 वाजता तीन फेज वीजपुरवठा सुरू करून सकाळी 11 वाजता बंद केला जातो. त्यानंतर दिवसभर केवळ सिंगल फेज वीज दिली जाते. रात्रीदेखील काही कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली तीन फेज वीज दिवसा उपलब्ध नसल्याने शेतकर्यांचे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनियमित वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून परीक्षेच्या काळात त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महिलांना रात्रीच्या अंधारात घरगुती कामे करावी लागत असून पावसाळ्यात साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांकडे पर्यायी साधने नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत शेतीसाठी तीन फेज वीजपुरवठा आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत घरगुती वापरासाठी नियमित सिंगल फेज वीजपुरवठा द्यावा अशी मागणी करण्यात आली असून 1 ऑगस्टपर्यंत नियमित वीजपुरवठा सुरू न झाल्यास लोणी, कान्सूर, तुरा, जैतापूरवाडी, चाटे पिंपळगाव, सारोळा, विटा, बाबुलतार, बांदरवाडा, खेडुळा, वडी, निवळी, पाटोदा यांसह सर्व प्रभावित गावांतील नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis