
रायगड, 20 जुलै (हिं.स.)। : पोस्ट ऑफिसमध्ये जाताना छत्री घेऊन जा! ही सूचना आता नेरळकरांसाठी विनोद राहिलेली नसून वास्तव बनली आहे. नेरळ येथील पोस्ट ऑफिस इमारतीचे छत गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळत असल्याने नागरिकांना कार्यालयाच्या आतच छत्री उघडून व्यवहार करावे लागत आहेत. सरकारी कार्यालयातील या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दररोज शेकडो नागरिक टपाल, बँकिंग व इतर शासकीय कामांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये येतात. मात्र पावसाळा सुरू होताच कार्यालयाच्या छतामधून ठिकठिकाणी पाणी गळू लागते. त्यामुळे जमिनीवर पाण्याचे डबके साचतात आणि नागरिकांना ओल्या जागेत उभे राहून कामे करावी लागतात. कर्मचारी वर्गालाही गळतीच्या छताखाली काम करण्याची वेळ आली असून, महत्त्वाची कागदपत्रे आणि उपकरणांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून काही ठिकाणी बांधकाम खचल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ही इमारत सुरक्षित आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम असतानाही कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.
याबाबत पोस्ट ऑफिसच्या संबंधित अधिकारी रिना मॅडम यांनी मुख्य कार्यालयाकडून तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री लावण्याच्या सूचना मिळाल्या असून दोन दिवसांत ते काम पूर्ण केले जाईल, असे सांगितले. मात्र नागरिकांनी या तात्पुरत्या उपायांवर नाराजी व्यक्त करत, तातडीने इमारतीची संरचनात्मक तपासणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती अथवा नवीन इमारतीची उभारणी करण्याची मागणी केली आहे.
सरकारी कार्यालयातच नागरिकांना छत्री घेऊन कामे करण्याची वेळ येत असेल, तर सार्वजनिक सुविधांच्या देखभालीबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल आता नेरळकर विचारत आहेत. आणखी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)