
अमरावती, 20 जुलै (हिं.स.) : अंजनगावबारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेसमोरील चावळी चौकात मोकाट जनावरांचा वाढता वावर विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी गंभीर समस्या बनला आहे. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटीच्या वेळेत गायी, बैल व वासरे थेट प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून बसत असल्याने विद्यार्थिनींना भीतीच्या वातावरणात शाळेत ये-जा करावी लागत आहे.
प्रत्यक्ष पाहणीत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मोकाट जनावरे बसलेली आढळून आली. त्यामुळे विद्यार्थिनींना या जनावरांमधून वाट काढत शाळेत प्रवेश करावा लागत आहे. एखादे जनावर अचानक उधळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे.
शाळेसमोर दुचाकी वाहने, लहान मुले आणि मोकाट जनावरे एकाच ठिकाणी असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. याशिवाय जनावरांच्या वावरामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि पालकांनी ग्रामपंचायत प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना लेखी निवेदने देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
शिक्षणाच्या मंदिरासमोरील या परिस्थितीबाबत पालकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी