
रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे घेण्यात आलेल्या ज्येष्ठ लेखक खींद्र पिंगे ललित लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि गावकी व परिवर्तन या दोन या पुस्तकांचे प्रकाशन २ ऑगस्ट रोजी होणार आहे.
जनसेवा ग्रंथालयातर्फे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोकण विभागीय रवींद्र पिंगे ललित लेखन स्पर्धा आयोजित केली होती. तिचे पारितोषिक वितरण, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि लेखक शरद प्रभुदेसाई यांचे परिवर्तन हे पुस्तक, तसेच संगमेश्वरी बोलीतील लेखक अमोल पालये यांच्या गावकी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता झाडगाव येथील माधवराव मुळ्ये सभागृहात होणार आहे. यावेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे आणि ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी आणि कार्यवाह ओंकार मुळ्ये यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी