मंगळवेढ्यात दुष्काळाचे सावट; चारा, पाणी आणि रोजगाराची मागणी
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)। यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून चारा, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत तातडीच्या उपाययोजना राबवा
मंगळवेढ्यात दुष्काळाचे सावट; चारा, पाणी आणि रोजगाराची मागणी


सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)।

यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून चारा, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर कौडूभैरी, मुजफ्फर काझी, संतोष रंधवे, सिताराम भगरे, संजय लेडवे आणि परमेश्वर लेडवे उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दमदार पावसाअभावी यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात केवळ ११ टक्के पेरणी झाली असून सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. याचा परिणाम शेतीबरोबरच तालुक्यातील ९४ हजारांहून अधिक पशुधनावर होत असून हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.सध्या नदीकाठावरील उसाचा चारा म्हणून वापर केला जात असून त्यासाठी सुमारे ४ हजार रुपये प्रतिटन खर्च करावा लागत आहे. त्यामुळे दूध व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वैरण खरेदीवर खर्च होत असून पशुपालक गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधताना, तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याने नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा लाभ सर्व गावांना मिळत नसून, आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अनेक गावांमध्ये अद्याप पाणी पोहोचलेले नाही.या पार्श्वभूमीवर गावनिहाय परिस्थितीची पाहणी करून ज्या ठिकाणी पाणीटंचाई तीव्र आहे, तेथे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सर्वसमावेशक मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande