
नंदुरबार, 20 जुलै (हिं.स.) | महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मधकेंद्र (मधमाशी पालन) योजना’ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक उत्पन्न वाढविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मधमाशी पालन व्यवसायाला चालना देणे, शेतकरी व मधपाळांचे उत्पन्न वाढविणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी दिली आहे.
मधमाशी पालन हा शेतीला पूरक आणि कमी जागेत, कमी भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय आहे. मध व मेणाच्या विक्रीतून उत्पन्न मिळण्याबरोबरच मधमाशांच्या परागीभवनामुळे शेती उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत होते. याशिवाय रॉयल जेली, प्रोपोलिस आणि मधमाशांचे विष यांसारख्या मौल्यवान उपउत्पादनांची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधमाशी पालनासाठी आवश्यक प्रशिक्षण, मधपेट्या, मधमाशी वसाहत, मधयंत्रे तसेच इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाणार असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याला स्वतः गुंतवावी लागणार आहे.
योजनेच्या जनजागृतीसाठी तालुकास्तरावर 50 शेतकरी व मधपाळांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. वैयक्तिक मधपाळांना 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल, तर प्रगतीशील मधपाळ आणि संस्थेच्या सदस्यांना महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 20 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण काळात राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था मंडळाकडून मोफत करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी अर्जदार साक्षर आणि 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असणे आवश्यक आहे. प्रगतीशील मधपाळांसाठी किमान 10 वी उत्तीर्ण असणे तसेच स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावावर किमान एक एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे. संस्थांसाठी नोंदणी, एक एकर शेतजमीन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी 500 चौरस फुटांची इमारत आवश्यक आहे.
अर्जासोबत आधार कार्ड, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, सातबारा व आठ-अ उतारा, बँक पासबुकची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे.
इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, नंदुरबार येथील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता दुसरा मजला, खोली क्रमांक 222, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार असा आहे. संपर्क क्रमांक 02564-210053 आणि भ्रमणध्वनी 8999349569 (दक्षता चव्हाण, मधुक्षेत्रिक) असा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर