खानाव दुर्घटनेतूनही धडा नाही; चिडीपाड्यात मोरी खचल्याने रेवस मार्ग धोक्यात
रस्त्याच्या कडेला मोठे भगदाड; तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी
No lessons learned from the Khanav tragedy; Revas route at risk as a culvert collapses in Chidipada.


रायगड, 20 जुलै (हिं.स.)। : अलिबाग–रेवस या महत्त्वाच्या मार्गावरील चिडीपाडा येथे मोरी खचल्याने रस्त्याच्या कडेला मोठे भगदाड पडले असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे ही परिस्थिती अधिक धोकादायक बनली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित मोरी धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती. मात्र, वेळेत दुरुस्ती न झाल्याने अखेर मोरीचा भाग खचला. या मार्गावर दररोज हजारो वाहने, शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी खानाव–उसर परिसरात अशाच प्रकारच्या भगदाडामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक मोऱ्या व पुलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची अपेक्षा होती. मात्र, चिडीपाडा येथील प्रकारामुळे प्रशासनाने त्या घटनेतून कोणताही धडा घेतला नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी तातडीने मोरीची दुरुस्ती करून संरक्षक कठडे, परावर्तित इशारा फलक आणि रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसेल अशी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणातील निष्काळजीपणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

चिडीपाडा येथील मोरी खचल्याची घटना ही केवळ रस्त्याच्या दुरवस्थेची बाब नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आणखी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande