
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या कथित मनमानी निधी वाटपाच्या निषेधार्थ एमआयएमचे माजी शहराध्यक्ष फारूक शाब्दिक यांनी 23 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
शाब्दिक यांनी आरोप केला आहे की, शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासनिधीचे वाटप करताना पारदर्शकता राखली जात नसून पक्षपाती पद्धतीने निधीचे वितरण केले जात आहे. या विरोधात ते गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून पूनम गेट येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
या उपोषणाच्या माध्यमातून महापालिकेच्या निधी वाटपात पारदर्शकता आणावी, सर्व प्रभागांना समान न्याय मिळावा आणि कथित मनमानी कारभार थांबवावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे शाब्दिक यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनाच्या घोषणेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष यावर काय भूमिका घेतात, तसेच या आरोपांवर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड