
लातूर, 20 जुलै (हिं.स.)।
१ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून, २०२६ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आता १ जुलै, २०२६ पासून एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशा वाहनांचे पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांना एचएसआरपी पाटी बसविणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल, २०१९ पूर्वीच्या वाहनांना पाटी बसविण्यासाठी ३० जून, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत पाटी न बसविलेल्या वाहनांचे हस्तांतरण, पत्ता बदलणे, कर्जबोजा चढविणे यांसारख्या सेवांवर आधीच निर्बंध लादण्यात आले होते.
यापुढे एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण यासह सर्व प्रकारची कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. तसेच १ जुलै, २०२६ पासून अशा वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ५०/१७७ नुसार कारवाई करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांनी ३० जून, २०२६ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृतपणे आगाऊ नोंदणी केली आहे, अशा वाहनांना तूर्तास दंडात्मक कारवाईतून सूट देण्यात येणार आहे. तरी ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्या सर्व वाहनधारकांनी अधिकृत फिटमेंट सेंटरकडून आपल्या वाहनांना लवकरात लवकर एचएसआरपी पाटी बसवून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गवारे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis