
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)। भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी (Matching Schemes) व असमान निधी (Non-Matching Schemes) योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीन विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. सन 2026-27 या साठी योजनांच्या नियमावली, अटी-शर्ती तसेच अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक ग्रंथालयांनी तेथून अर्ज डाउनलोड करून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत. समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय इमारत बांधकाम व विस्तारासाठी कमाल 25 लाख रुपये इतके अर्थसहाय्य उपलब्ध आहे. तसेच असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ साधनसामग्री,फर्निचर इमारत बांधकाम, व विस्तार यासाठी अर्थसहाय्य (फर्निचर-रू.4 लाख,इमारत बांधकाम एकदाच प्रस्ताव रु.10 ते 15 लाख ) ज्ञानकोपरा विकसित करण्यासाठी रू.2.50 लाख व विशेष अर्थसहाय्य आधुनिकिकरण रु.2 लाख. मोहोत्सवी वर्ष जसे 50 / 60/ 75 /100 /125/ 150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य रु.6.20 लाख व इमारत विस्तार रू.10 लाख. राष्ट्रीय चर्चासत्र ,कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य रु.1.50 लाख /रू.2.50 लाख / रू.3 लाख. बालकोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य कमाल रू.6.80 लाख. उपरोक्त योजनेसाठी इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील प्रस्ताव इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतींमध्ये संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. 21 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करावेत. तसेच हे प्रस्ताव राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही ऑनलाईन पाठवावेत.असे आवाहन प्र.ग्रंथालय संचालक ,मुंबई ,अशोक गाडेकर यांनी केले आहे. या बाबत अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र.त्रिं. पाटील यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड