
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)।
सोलापूर शहरातील सजग नागरिकांच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेजवळील पूनम गेट येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाईचा निषेध आणि त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागणीसाठी विविध क्षेत्रांतील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
या आंदोलनात वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी शांततापूर्ण घोषणाबाजी करत लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडली. नागरिकांचा आवाज शासनाने ऐकावा आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील विविध समस्या, विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न आणि सार्वजनिक धोरणांबाबत शासनाने व्यापक संवाद साधण्याची गरज अधोरेखित केली. सामाजिक प्रश्नांवर लोकशाही पद्धतीने आवाज उठविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी निलेश संगेपाग, निरंजन बोध्दूल, शेखर बंगाळे, मल्लिकार्जुन पिलगेरी आणि रोबर्ट गौडर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शांततापूर्ण वातावरणात आंदोलनाची सांगता झाली. भविष्यातही जनहिताच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने एकत्रितपणे भूमिका मांडण्याचा निर्धार सहभागी नागरिकांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड