नीरा स्नानानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.) : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी सकाळी पारंपरिक नीरा स्नान विधीनंतर सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी येथील अखेरचा मुक्काम पूर्ण केल्यानंतर पालखीने अकलूजच्या
hgfh


सोलापूर, 20 जुलै (हिं.स.) : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी सकाळी पारंपरिक नीरा स्नान विधीनंतर सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी येथील अखेरचा मुक्काम पूर्ण केल्यानंतर पालखीने अकलूजच्या दिशेने प्रस्थान केले.

देहू संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी 7.16 वाजता नीरा नदीपात्रात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना विधिवत स्नान घालण्यात आले. यावेळी पाणी, दूध आणि दही यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच चंदन, हळद, अष्टगंध आणि बुक्का लावून आरती करण्यात आली.

तुकोबा... तुकोबा...च्या जयघोषात हजारो वारकऱ्यांनी पादुकांचे दर्शन घेत पुष्पवृष्टी केली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या शाही स्नान सोहळ्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याने पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदी पार करत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे प्रवेश केला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात हजारो वारकऱ्यांनी नदीपात्रात स्नान करत भक्ती आणि आनंदाचा अनुभव घेतला.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील चार मुक्काम पूर्ण केल्यानंतर पालखी सोहळ्याला पुणे जिल्ह्यातील प्रशासन, ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी भावपूर्ण निरोप दिला.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर पालखी सोहळ्यातील मानाचे तिसरे गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी वारकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असून अकलूज नगरी भक्तिरसात रंगली आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande