पावसाने दडी मारताच चिखलदऱ्यात पर्यटकांची ओढ कमी; पर्यटन व्यवसायाला फटका
अमरावती, 20 जुलै (हिं.स.) : गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. पर्यटकांची संख्या घटल्याने हॉटेल, होमस्टे आणि लहान व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले असून अनेक प
पावसाने दडी दिल्याने चिखलदऱ्याला पर्यटकांची पाठ


अमरावती, 20 जुलै (हिं.स.) : गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. पर्यटकांची संख्या घटल्याने हॉटेल, होमस्टे आणि लहान व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले असून अनेक पर्यटनस्थळांवर रविवारी शुकशुकाट पाहायला मिळाला.

सामान्यतः दमदार पावसानंतर चिखलदऱ्यातील विविध धबधबे प्रवाहित होतात. या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी दर शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल होतात. गत आठवड्यातही यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अशी गर्दी पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांनी चिखलदऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

पर्यटकांची वर्दळ कमी झाल्यामुळे येथील अनेक हॉटेल्स आणि होमस्टे रिकामे पडले असून पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. तसेच पावसाळ्यात पर्यटकांवर अवलंबून असलेले खाद्यपदार्थ विक्रेते, हस्तकला विक्रेते आणि इतर लहान व्यावसायिकांचा व्यवसायही मंदावला आहे.

दरम्यान, अपुऱ्या पावसामुळे येथील तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नसल्याने बोटिंग सेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी बोटिंग व्यवसायासह त्यावर अवलंबून असलेल्या अनेकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.

स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास धबधबे पुन्हा प्रवाहित होतील आणि पर्यटकांची संख्या वाढून पर्यटन व्यवसायाला पुन्हा चालना मिळेल.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande