
सर्पमित्रांनी सुरक्षित रेस्क्यू करून जंगलात सोडले
अमरावती, 20 जुलै (हिं.स.) : नांदगावपेठ परिसरात दुर्मिळ पोवळा (कोरल स्नेक) जातीचे दोन विषारी साप एकाच दिवशी आढळून आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. जीवरक्षणम फाउंडेशन आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दोन्ही सापांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवरक्षणम फाउंडेशनचे सदस्य मनोज हटवार यांनी प्रथम एका पोवळा सापाचे रेस्क्यू करून त्याला सुरक्षित जंगलात सोडले. त्याच रात्री नांदगावपेठ येथील रोशन डोईफोडे यांच्या घराजवळ आणखी एक पोवळा साप आढळून आला. त्यांनी तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने दुसऱ्या सापालाही सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडले. रेस्क्यूदरम्यान सर्पमित्रांनी सांगितले की, पोवळा हा भारतातील सर्वांत लहान विषारी सापांपैकी एक असून तो दुर्मिळ कोरल स्नेक प्रजातीचा आहे. या सापामध्ये नाग आणि मण्यारप्रमाणे न्यूरो-टॉक्सिक विष आढळत असल्याने तो अत्यंत विषारी मानला जातो. साधारण एक ते दीड फूट लांबीचा आणि करंगळीएवढ्या जाडीचा हा साप ओलसर माती, पानांचे ढिगारे तसेच विटा-दगडांच्या खाली वास्तव्य करतो. त्यामुळे तो सहसा सहज नजरेस पडत नाही. त्याच्या पोटाखालचा केशरी रंग हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.दरम्यान, सर्प आढळल्यास त्याला मारण्याऐवजी तातडीने प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी