व्हीएमव्ही परिसरात मॉर्निंग वॉकवर वेळेचे निर्बंध; नागरिकांमध्ये संताप
अमरावती, 20 जुलै (हिं.स.) : नागरिकांना नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या शासनाच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या (व्हीएमव्ही) परिसरात मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांव
व्हीएमव्ही परिसरात अघोषित मॉर्निंग वॉक बंदी


अमरावती, 20 जुलै (हिं.स.) : नागरिकांना नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या शासनाच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या (व्हीएमव्ही) परिसरात मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांवर लावण्यात आलेल्या वेळेच्या निर्बंधांमुळे नाराजी व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, मागील तीन-चार दिवसांपासून व्हीएमव्ही परिसरात सकाळी ५ ते ७ या वेळेतच प्रवेशाची परवानगी दिली जात असून त्यानंतर संस्थेची चारही प्रवेशद्वारे कुलूपबंद केली जात आहेत. विशेष म्हणजे, अनेक नागरिक पहाटे पाच वाजताच परिसरात पोहोचत असतानाही प्रवेशद्वार बंद असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

शहरातील वाढते शहरीकरण, सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आणि वाहतुकीची वाढती वर्दळ यामुळे सुरक्षित वातावरणात चालण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण गेल्या अनेक वर्षांपासून व्हीएमव्हीच्या निसर्गरम्य परिसराचा वापर करतात. मात्र नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांच्यात नाराजी पसरली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इतर प्रवेशद्वारांमधून आत जाण्याचा प्रयत्न केल्यास सुरक्षा रक्षकांकडून अडवणूक केली जाते, तसेच धमकावले जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधींना निवेदन देत संबंधित सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करून नागरिकांची गैरसोय थांबविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या निर्बंधांबाबत संस्था प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande