
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सोलापूर जिल्ह्यातील आगमनानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी दिली आहे. नातेपुते ते शिंगणापूर पाटी या मार्गावर कारवाई करत २० पुरुष आणि २१ महिला अशा एकूण ४१ खिसेकापू व मोबाईल चोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.पत्रकार परिषदेत बोलताना कुलकर्णी यांनी सांगितले की, यंदाच्या वारीत प्रथमच ५जी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे विविध विभागांतील अधिकारी एका नेटवर्कद्वारे जोडले गेले असून, घटनांची माहिती आणि समन्वय अधिक वेगाने होत आहे. तसेच रिंगण आणि मुक्कामस्थळी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस मदत केंद्रे आणि वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.वारकरी आणि भाविकांनी पालखी सोहळ्याचे अद्ययावत स्थान sp.solapur.gov.in या संकेतस्थळावरून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.यंदा वारीत वाहनांची संख्या लक्षणीय वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे दिंडीतील तसेच इतर वाहनचालकांनी वाहने रस्त्यावर किंवा वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी उभी करू नयेत. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही मार्गांमध्ये बदल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.वारकरी व भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जी. बी. जगताप आणि पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड