जयकुमार गोरे यांनी घेतला वारकऱ्यांच्या सुविधांचा आढावा
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.) : आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडून वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे य
Wari 1 Solapur


सोलापूर, 20 जुलै (हिं.स.) : आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडून वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री गोरे यांनी संस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख आणि वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.

भेटीदरम्यान पालकमंत्री गोरे यांनी कोणताही औपचारिक बडेजाव न ठेवता पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर ते वारकऱ्यांसोबत पायी चालत कारुंडे बंगला येथील माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी सोहळा प्रमुखांसोबत चर्चा केली आणि वारकऱ्यांसोबत जमिनीवर बसून प्रसाद ग्रहण केला.

तसेच कार्यालयातही त्यांनी जमिनीवर बसून पालखी सोहळ्यातील विविध सुविधांचा आढावा घेतला. त्यांच्या साधेपणाची वारकऱ्यांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ऍड. राजेंद्र उमाप यांनी संस्थानच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा महावस्त्र आणि प्रसाद देऊन सत्कार केला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande