
अमरावती, 20 जुलै (हिं.स.) : सायबर फसवणुकीतून मिळालेल्या पैशांच्या व्यवहारासाठी एका महिलेच्या बँक खात्याचा वापर करून लाखो रुपयांची उलाढाल केल्याप्रकरणी शहरातील तिघांविरुद्ध सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय महेशलाल झामनानी, मयूर मोटवाणी आणि निखिलेश जयरामदास रामरख्यानी (सर्व रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही संशयित व्यावसायिक असून, त्यांनी एका महिलेला प्रॉपर्टी विक्रीच्या व्यवहारातील ६० लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे खोटे कारण सांगितले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्याचे पासबुक, एटीएम कार्ड तसेच खात्याशी संलग्न मोबाईल क्रमांकाचे सिमकार्ड स्वतःकडे घेतले. त्याबदल्यात महिलेस आर्थिक लाभाचे आमिष दाखविण्यात आले होते.
यानंतर महिलेच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. तपासात सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यात वळविण्यात आल्याची माहिती समोर आली. हा प्रकार लक्षात येताच संबंधित महिलेने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी तिघांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचे बँक खाते पैशांचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी वापरल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक किंवा सिमकार्ड कोणालाही देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी