
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) । महाराजस्व समाधान शिबिर हे केवळ शासकीय औपचारिकता नसून नागरिकांच्या विविध समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. त्यामुळे सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, असे निर्देश आमदार राजेश बकाने यांनी दिले.
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत देवळी विधानसभा मतदारसंघात १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिराच्या नियोजनासाठी पंचायत समिती, वर्धा येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बकाने बोलत होते.
बैठकीला नगरपरिषद उपाध्यक्ष राहुल चोपडा, पट्टा वाटप समितीचे सहअध्यक्ष दीपक बावनकर, उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल चौधरी, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, प्रफुल्ल लोखंडे, मुख्याधिकारी नेहा आकोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार बकाने यांनी महसूल विभागासह सर्व विभागांनी आपल्या योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि सेवा-सुविधा शिबिरात उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगितले. नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून शिबिर अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि परिणामकारक बनवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जमिनीचे सातबारा, फेरफार, वारसा नोंद, जात व उत्पन्न प्रमाणपत्रे, विविध दाखले, संजय गांधी योजना, महिला व बालविकास, कृषी, रोजगार, कौशल्य विकास, आरोग्य, बँकिंग, सहकार आदी योजनांशी संबंधित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वर्ध्यात २२ ते २४ जुलैदरम्यान मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य अमृत महोत्सव’ अंतर्गत जिल्ह्यातील पहिले मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर २२ ते २४ जुलैदरम्यान बच्छराज धर्मशाळा प्रांगण, शास्त्री चौक, वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटन बुधवारी (ता.२२) सकाळी १० वाजता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार अमर काळे, विविध आमदार, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या शिबिरात वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांचे मोफत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार तसेच शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.
विविध आजारांची होणार तपासणी
शिबिरात ज्येष्ठ नागरिक तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग तसेच संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात येणार आहे.
याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, औषध वितरण, मोफत चष्मे वाटप, दिव्यांगांना साहित्य वितरण आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी व लाभार्थी सहाय्य केंद्रही कार्यरत राहणार आहे.
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र नोंदणी व तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांना नोंदणीपासून उपचार व औषध वितरणापर्यंत सर्व सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान करून घ्यावे आणि या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी