आर्णीतून पंतप्रधानांना स्पीड पोस्टद्वारे 20 पत्रे: शिक्षण व्यवस्थेत सुधारणेची मागणी
यवतमाळ, 21 जुलै (हिं.स.) । दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आर्णी शहरातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. भारतातील शिक्षण व्यवस्थेत सर्वसमावेशक
आर्णीतून पंतप्रधानांना स्पीड पोस्टद्वारे 20 पत्रे:भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची मागणी


यवतमाळ, 21 जुलै (हिं.स.) । दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आर्णी शहरातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. भारतातील शिक्षण व्यवस्थेत सर्वसमावेशक सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आर्णीतील २० नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीड पोस्टद्वारे निवेदन पाठवून देशव्यापी मोहिमेला प्रारंभ केला.

या मोहिमेचा उद्देश कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करणे किंवा कोणत्याही व्यक्तीचा विरोध करणे नसून, जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला नैतिक पाठिंबा देणे हा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे आणि देशातील शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी लोकशाही मार्गाने मांडणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले.

मोहिमेअंतर्गत सहभागी नागरिकांना निवेदनाचा मसुदा आणि लिफाफे उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांनी त्यावर स्वतःचे नाव, पत्ता आणि स्वाक्षरी करून ही निवेदने स्पीड पोस्टद्वारे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविली.

स्पीड पोस्टद्वारे पाठविलेल्या पत्राची अधिकृत पोचपावती मिळत असल्याने नागरिकांच्या सहभागाचा पुरावा त्यांच्याकडे कायम राहतो, असे आयोजकांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही लोकशाही पद्धतीची मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande