
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या नामघोषात आणि विठुरायाच्या भेटीच्या ओढीने मोर्शी तालुक्यातील ४१ वारकरी सोमवारी एकाच ‘पंढरपूर वारी स्पेशल’ एसटी बसमधून पंढरपूरकडे रवाना झाले. एकाच गावातील सर्व वारकरी एकाच विशेष एसटी बसने वारीसाठी निघाल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्रित प्रवास करणार असल्यास त्यांच्यासाठी पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी विशेष बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेत मोर्शी तालुक्यातील किन्हाळा गावातील ४१ वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले. या वारकऱ्यांमध्ये १२ पुरुष आणि २९ महिला भाविकांचा समावेश आहे.
प्रस्थानापूर्वी बसचे चालक मंगेश वानखडे आणि वाहक किशोर मोहोड यांचा नारळ व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोर्शी आगाराचे आगार व्यवस्थापक योगेश ठाकरे, आगारातील अधिकारी व कर्मचारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब, भाजप शहराध्यक्ष राहुल चौधरी, ब्रम्हानंद देशमुख, नितीन चिखले, अजय आगरकर, मनीष केचे, श्रीकांत सीनकर, अंबादास सीनकर, नितीन पन्नासे, राजू श्रीराव, शांतीदास उमक, महादेव नवघरे, प्रीती देशमुख, मंगला पडोळे, रोशन बुरंगे, भूषण पडोळे, उज्वल निचीत, धीरज निस्वादे आदी उपस्थित होते.
एकाच गावातील सर्व वारकऱ्यांना एकत्रित प्रवासाची संधी मिळाल्याने दोन-चार जणांच्या गटाने वेगवेगळे प्रवास करण्याची गरज राहिली नाही. प्रवासादरम्यान वारकरी एकत्रितपणे विठुरायाचे नामस्मरण, हरिपाठ, भजन-कीर्तन तसेच नाश्ता, चहा आणि भोजनाचा आनंद घेणार असल्याने ही वारी अधिक संस्मरणीय आणि भक्तिमय ठरणार आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी