चांदूरबाजार तालुक्यात सीईओंकडून विकासकामांची पाहणी
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी चांदूरबाजार तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा, प्राथमिक आरोग्यकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार, पारदर
विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा ः सीईओ


अमरावती, 21 जुलै (हिं.स.) । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी चांदूरबाजार तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा, प्राथमिक आरोग्यकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

घाटलाडकी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी कामांची गुणवत्ता, प्रगती आणि नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शासनाच्या निधीतून सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट गुणवत्तेसह आणि ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यानंतर त्यांनी घाटलाडकी येथील शाळेला भेट देऊन शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा तसेच नवीन इमारतीच्या कामाची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. आदर्श शाळेच्या नवीन इमारतीची उर्वरित कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करून इमारत हस्तांतरित करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी गांधी यांनी प्राथमिक आरोग्यकेंद्राची पाहणी करताना कर्मचारी उपस्थिती, रुग्णसेवा, स्वच्छता व्यवस्था, औषधसाठा आणि उपचार सुविधांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

दौऱ्यादरम्यान त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यालाही भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. ग्रामीण भागातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने नियमित देखरेख ठेवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande