लातूर : मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
लातूर, 21 जुलै (हिं.स.)। जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मंगळवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची पाहणी करून विविध शासकीय कार्यालयांतील स्वच्छता, अभिलेख कक्ष आणि भांडार कक्षांचा आढावा घेतला. इमारतीतील प्रत्येक कार्यालय आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच
जिल्हाधिकारी लातूर


लातूर, 21 जुलै (हिं.स.)।

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मंगळवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची पाहणी करून विविध शासकीय कार्यालयांतील स्वच्छता, अभिलेख कक्ष आणि भांडार कक्षांचा आढावा घेतला. इमारतीतील प्रत्येक कार्यालय आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे, उपविभागीय अभियंता राजेंद्र बिराजदार तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी कोणत्याही कार्यालयात अनावश्यक कचरा अथवा निरुपयोगी साहित्य साठवून ठेवू नये, अशा सूचना दिल्या. कार्यालयाबाहेरील मोकळ्या जागेची स्वच्छता राखण्याची जबाबदारीही संबंधित कार्यालयाचीच असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विभागप्रमुखांनी आपापले कार्यालय आणि परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच इमारतीच्या काही भागांमध्ये दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, असेही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande