
पुणे, 21 जुलै (हिं.स.)। मोशी परिसरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या तक्रारीची महापौर रवि लांडगे यांनी तातडीने दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेतील रहिवाशांनी परिसरात वारंवार प्लास्टिक, टायर आणि इतर भंगार जाळले जात असल्याने गंभीर वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार महापौरांकडे निवेदनाद्वारे केली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापौर रवि लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. परिसरातील धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाची सुरक्षितता ही महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. शहरात प्रदूषण करणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही पाठीशी घालण्यात येणार नाही. स्वच्छ हवा, निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित जीवनमान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून तो अबाधित राखण्यासाठी कठोर आणि प्रभावी कारवाई केली जाईल. या बैठकीस माजी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे तसेच कविता आल्हाट उपस्थित होत्या.
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच अनधिकृत भंगार साठे हटविणे, प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु