हॉटेलांच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणीची मागणी
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : मोर्शी शहरासह सिंभोरा रोड आणि मोर्शी-वरुड मार्गावरील हॉटेल व धाब्यांमधील स्वयंपाकगृहांच्या स्वच्छतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे पालन होत आहे का,
हॉटेलांच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करण्याची मागणी


अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : मोर्शी शहरासह सिंभोरा रोड आणि मोर्शी-वरुड मार्गावरील हॉटेल व धाब्यांमधील स्वयंपाकगृहांच्या स्वच्छतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे पालन होत आहे का, याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरात सुमारे २५ ते ३० हॉटेल व धाबे कार्यरत असून, दररोज मोठ्या संख्येने नागरिक येथे भोजनासाठी येतात. हॉटेलांची बाह्य व्यवस्था आकर्षक असली तरी काही ठिकाणी स्वयंपाकगृहांमध्ये आवश्यक स्वच्छतेचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही हॉटेलांमध्ये भांडी योग्य प्रकारे स्वच्छ केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच स्वयंपाकगृहात किंवा एकाच साधनांचा वापर करून तयार केले जात असल्याने अन्नाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

काही स्वयंपाकगृहांच्या छतावर धूळ, जळमटे आणि पालींचा वावर असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अन्न दूषित होण्याची शक्यता वाढून अन्नजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, काही हॉटेलांमध्ये आरोग्यास अपायकारक कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याची चर्चा असून, त्याचीही चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक आरोग्य विभागाने संयुक्तपणे शहरातील सर्व हॉटेल व धाब्यांची तपासणी करून स्वच्छता, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि आवश्यक परवान्यांची पडताळणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मोर्शी शहरातील सर्व हॉटेल चालकांनी आपल्या स्वयंपाकगृहांची स्वच्छता राखावी. अस्वच्छ किचन आढळल्यास नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी स्वच्छता व आरोग्य अधिकारी मनीषा ढोणे यांनी दिला आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande