
पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.) : “संकल्प हरित महाराष्ट्राचा – सहभाग प्रत्येक जनमानसाचा” या अभियानांतर्गत “देवेंद्रजी जन्मोत्सव – हरित महोत्सव” तसेच “हरित महाराष्ट्र सप्ताह” आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालय, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भाजपचे माजी आमदार संजय केनेकर यांनी अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे आणि आगामी उपक्रमांची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. पर्यावरण संवर्धन, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि नागरिकांचा सहभाग वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला लोकसहभागाची जोड देत पर्यावरण संरक्षणाची ही चळवळ व्यापक जनआंदोलन बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे संजय केनेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, हरित आणि समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis