
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे गुरुवार, २४ जुलै रोजी अमरावती येथे ‘माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा भावस्पर्शी रंगमंचीय आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सादर करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासावर आधारित या नाट्यमय प्रयोगात त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, भक्ती, अध्यात्म, समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश संगीत, अभिनय, नृत्य तसेच प्रभावी नेपथ्याच्या माध्यमातून सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमातून संत परंपरेचा समृद्ध वारसा आणि ज्ञानेश्वरांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्य, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मातून समता, करुणा, विश्वबंधुत्व व मानवकल्याणाचा संदेश दिला. त्यांच्या पसायदानमधील ‘दुरितांचे तिमिर जावो’ हा संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा मानला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे जीवनकार्य आणि आध्यात्मिक परंपरा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, ‘माऊली’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, अमरावती व परिसरातील वारकरी, कला रसिक, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी