अचलपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शाळाभेटी; विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचा घेतला आढावा
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : अचलपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने प्रत्यक्ष शाळा भेटींचा उपक्रम हाती घेतला आहे. गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात, विस्तार अधिकारी तथा गटसमन्वयक राम चौधरी यांच्यासह शिक
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अचानक शाळाभेटी


अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : अचलपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने प्रत्यक्ष शाळा भेटींचा उपक्रम हाती घेतला आहे. गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात, विस्तार अधिकारी तथा गटसमन्वयक राम चौधरी यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विविध शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, गणितीय क्षमता आणि एकूण अध्ययन स्तराची पडताळणी करत त्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनही दिले.

शाळांमध्ये राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा तसेच उपलब्ध शैक्षणिक साधनसामग्रीची पाहणीही करण्यात आली. यावेळी शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा ओळखून वैयक्तिक लक्ष देण्याच्या, अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याच्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

चालू शैक्षणिक वर्षात अचलपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी अशा शाळाभेटी आणि नियमित आढावा सातत्याने सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, यासाठी शिक्षकांनी विशेष दक्षता घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्धपणे कार्य करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात यांनी केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande