
वर्धा, 21 जुलै (हिं.स.) । प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यात धावणाऱ्या १६ वर्षांची मुदत पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षांवर आता स्क्रॅपिंगची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या ऑटोरिक्षांची नोंदणी दिनांकापासून १६ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा वाहनांच्या मालकांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली वाहने स्वतःहून अधिकृत स्क्रॅपिंग केंद्रामार्फत स्क्रॅप करावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या २१ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्यात मूळ नोंदणी दिनांकापासून १६ वर्षे पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षांना परवान्यातून उतरविण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत १६ वर्षांची मुदत पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा स्क्रॅप करण्याचे निर्देश प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिले आहेत.
मोटार वाहन अधिनियम १९८८, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ तसेच शासनाच्या स्क्रॅप धोरणानुसार १६ वर्षे पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा रस्त्यावर चालविणे अयोग्य ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा चालक व मालकांनी आपल्या वाहनांची नोंदणी तपासून मुदत पूर्ण झालेली वाहने तातडीने अधिकृत स्क्रॅपिंग केंद्रामार्फत निकाली काढावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, १६ वर्षांपेक्षा जुनी ऑटोरिक्षा रस्त्यावर चालविताना आढळल्यास संबंधित वाहनधारकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहन जप्त करणे आणि नोंदणी रद्द करणे यासारखी कारवाईही केली जाऊ शकते, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी