
लातूर, 21 जुलै (हिं.स.) - लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. कासारशिरसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
किल्लारी-उमरगा मार्गावरील नदीजवळील एका हॉटेलसमोर सापळा रचून बालाजी शिवाजी काळे (वय ४३, रा. साठे चौक, धाराशिव) याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून सोन्याचे दागिने व १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपीने साथीदारांसह कासारशिरसी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच औराद शहाजनी पोलीस ठाण्यातील आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याची माहिती समोर आली. चोरीतील काही सोन्याचे दागिने धाराशिव येथील सराफांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या, मणी, पान, मनगटी, पिंपळपान तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे कासारशिरसी येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून आणखी काही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कासारशिरसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis