नागपूर : आजारपणाला कंटाळून आई आणि मुलाची आत्महत्या
नागपूर,22 जुलै (हिं.स.) : नागपूरच्या जलालपुरा परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गंभीर आजाराशी दीर्घकाळ झुंजणाऱ्या अमया अनंता कानखोजे आणि त्यांचा मुलगा अद्वैत कानखोजे हे त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उजेडात आली. प्र
नागपूर : आजारपणाला कंटाळून आई आणि मुलाची आत्महत्या


नागपूर,22 जुलै (हिं.स.) : नागपूरच्या जलालपुरा परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गंभीर आजाराशी दीर्घकाळ झुंजणाऱ्या अमया अनंता कानखोजे आणि त्यांचा मुलगा अद्वैत कानखोजे हे त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उजेडात आली. प्राथमिक तपासात दोघांनी विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून घटनास्थळावरून एक सुसाइड नोटही पोलिसांना मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलालपुरा येथील श्री गुरु माउली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कानखोजे कुटुंबाचा शेजाऱ्यांशी फारसा संपर्क नव्हता. अमया कानखोजे या रेल्वे विभागात अनुकंपा तत्त्वावर कार्यरत होत्या. त्या स्तनाच्या कर्करोगाने (ब्रेस्ट कॅन्सर) ग्रस्त होत्या, तर त्यांचा मुलगा अद्वैत गंभीर आजारामुळे अंथरूणाला खिळला होता. अमया यांचा दुसरा मुलगा यश हा हैदराबाद येथे राहतो. त्याने मंगळवारी आईशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याला संशय आला. त्यानंतर त्याने नागपुरातील परिचित व्यक्ती आणि स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधून घराची पाहणी करण्याची विनंती केली.

नागरिकांनी तत्काळ कोतवाली पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर घराच्या मुख्य चॅनेल गेटला बाहेरून कुलूप असल्याचे, तर मागील दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता, दोघेही मृतावस्थेत आढळले. घटनास्थळावर विषाची बाटलीही सापडली आहे.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये गंभीर आजारपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख असून या टनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद करण्यात आले आहे. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande