
नाशिक, 25 जुलै (हिं.स.)।
: जमिनीच्या जुन्या वादातून झालेल्या तुंबळ मारहाणीमुळे व त्याच्या धक्क्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाथर्डी-माळेशिवार परिसरात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत वृद्धाचे नाव दत्तू अर्जुन जाधव (वय ६२, रा. माळेशिवार, पाथर्डीशिवार) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत दत्तू जाधव (वय ५९) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा व त्यांच्या भावकीतील महादु नामदेव जाधव व इतर नातेवाईकांमध्ये जमिनीच्या वाटपावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू असून त्यासंदर्भातील न्यायालयीन दावा प्रलंबित आहे.
शनिवारी (२५ जुलै) आषाढी एकादशीनिमित्त पाथर्डी फाटा येथे आयोजित महाप्रसाद कार्यक्रमावरून शशिकांत जाधव व त्यांचे चुलत भाऊ दत्तू जाधव हे दुपारी सुमारे १२ वाजता स्विफ्ट कारने घरी परतत होते. माळेशिवार परिसरातील पिंपळखाब रस्त्यावर महादु जाधव यांच्या शेताजवळ संशयितांनी त्यांची कार अडवली.
यानंतर जमिनीच्या वादावरून शिवीगाळ करत संशयितांनी शशिकांत जाधव यांना मारहाण केली. त्यानंतर दत्तू जाधव हे दहा वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असल्याची माहिती असूनही आरोपींनी त्यांना कारमधून बाहेर ओढून छाती व चेहऱ्यावर जबर मारहाण केली. तसेच, तुम्हा दोघांना गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीच्या तीव्र धक्क्यामुळे दत्तू जाधव यांची प्रकृती बिघडली. त्यांना प्रथम घरी आणण्यात आले. त्यानंतर अचानक चक्कर आल्याने ते कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी महादु नामदेव जाधव, राजाराम तुकाराम जाधव, जगन तुकाराम जाधव, मनोहर महादु जाधव, गोविंद महादु जाधव आणि सागर सदाशिव जाधव (सर्व रा. माळेशिवार, पाथर्डीशिवार, नाशिक) यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV