कर्जतमध्ये जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोघांवर गुन्हा दाखल
रायगड, 25 जुलै (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये ग
Land-dispute-in-Karjat-takes-a


रायगड, 25 जुलै (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या भिसेगाव येथील सर्व्हे क्रमांक ५२/१४ या मालकीच्या जागेवर गेले होते. त्यावेळी तेथे दोन आरोपी उपस्थित होते. जागेवर पोकलेन मशीन कोणी लावली, असा जाब फिर्यादींनी विचारला असता, आरोपींपैकी एकाने ही माझी जागा आहे, पुन्हा येथे आलास तर तुझे तंगडे तोडतो, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या डाव्या पायाला दुखापत झाली. झटापटीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून नुकसान झाले. तसेच दुसऱ्या आरोपीनेही हातात लोखंडी रॉड घेऊन पुन्हा मारहाण करण्यासाठी धाव घेत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), १३१, ३२४(४), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि/रोकडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande