
नाशिक, 25 जुलै (हिं.स.)। नाशिक शिक्षण विभागातील बहुचर्चित आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष वेधून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित तथा तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यास विशेष पोलिस तपास पथक (एसआयटी)ने जळगाव येथे धडक कारवाई करून अटक केली. त्याला शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
तब्बल ११०० पानी आरोपपत्र, ११९९ संशयित आणि सुमारे १६० कोटी रुपयांचा अपहार, एवढी व्यापक व्याप्ती असलेल्या या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. तपासात संबंधित संशयित, शिक्षण संस्था तसेच शिक्षण विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून बोगस कागदपत्रांच्या आधारे बनावट शालार्थ आयडी वितरित केल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांचा तपास प्रगतिपथावर आहे. यापूर्वी या घोटाळ्यात तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आता अटक करण्यात आलेला शशिकांत हिंगोणेकर हा या घोटाळ्यातील चौथा मोठा संशयित असून, तो जळगाव येथे तत्कालीन शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होता. या गुन्ह्यात त्याची नेमकी काय भूमिका होती, याचा एसआयटीकडून बारकाईने तपास केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV