
रत्नागिरी, 23 जुलै (हिं.स.) । चिपळूण तालुक्यातील अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तीन आराेपींना सांगली जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पवारवाडी फाटा आणि शिरगाव रहाटवाडी परिसरात चिपळूणचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने एकाच पद्धतीने नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळून जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी अलोरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने मार्गदर्शक सूचना देत पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष तपास पथके तयार केली होती.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सुरू असताना पोलिसांना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणातून महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मौजे वांगी येथे धडक कारवाई करत विश्वनाथ अमर शिंदे, प्रथमेश मलिक मोरे आणि अक्षय संभाजी जाधव या तीन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी