
लातूर, 23 जुलै (हिं.स.)।
हुंड्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मा. अतिरिक्त सत्र न्यायालय क्र. १, लातूर न्यायाधीश श्री. भोसले यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी पतीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. चाकूर पोलीस ठाण्याने केलेल्या प्रभावी तपासामुळे या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने दोषसिद्धीचा निकाल दिला.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादनुसार त्यांची मुलचा विवाह दि. २६ मे २०१७ रोजी झरी (बु.), ता. चाकूर येथील मोहमद इसाक शेख याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. व्यवसायासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत अशी मागणी करत तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.
छळ असह्य झाल्याने विवाहितेने अनेक वेळा आपल्या वडिलांना दूरध्वनीवरून आपबीती सांगितली. दोन्ही कुटुंबीयांनी अनेकदा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पुढे त्रास देणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतरही अत्याचार सुरूच राहिले. अखेर सततच्या छळाला कंटाळून दि. १६ जुलै २०१७ रोजी विवाहितेने विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले असता दि. १७ जुलै २०१७ रोजी तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी चाकूर पोलीस ठाणे गुरनं. २२२/२०१७ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०४-ब, ३०६, ४९८-अ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे व इतर भक्कम पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर प्रकरणाचा सत्र खटला क्र. १/२०२१ मा. अतिरिक्त सत्र न्यायालय क्र. १, लातूर येथे चालला. सरकारी पक्षाने प्रभावीपणे पुरावे मांडल्यानंतर न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले. आरोपी मोहमद इसाक शेख यास भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ अंतर्गत दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ए. ए. माने व सहायक पोलीस निरीक्षक जी. के. शेख यांनी केला. न्यायालयीन कामकाजात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. शिवनारायण रादंड यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी अंमलदार चंद्रकांत राचमाळे व प्रमोद तरडे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मोलाची मदत केली. कोर्ट समन्वय अधिकारी म्हणून सपोनी शिवशंकर मनाळे यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis