सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार
लातूर, 24 जुलै (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलिसांनी आणखी एक प्रतिबंधात्मक कारवाई करत शिरूर अनंतपाळ येथील सराईत गुन्हेगार उत्तम शिवराम गायकवाड (वय ५५) याला एक वर्षासाठी संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीतून ह
हद्दपार


लातूर, 24 जुलै (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलिसांनी आणखी एक प्रतिबंधात्मक कारवाई करत शिरूर अनंतपाळ येथील सराईत गुन्हेगार उत्तम शिवराम गायकवाड (वय ५५) याला एक वर्षासाठी संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली. पोलीस अभिलेखानुसार संबंधिताविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच त्याच्या हालचालींमुळे सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.

या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याने हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावावर नियमानुसार सखोल चौकशी करण्यात आली. संबंधितास नोटीस बजावून त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. साक्षीदारांचे जबाब, गुन्हेगारी अभिलेख, प्रतिबंधात्मक कारवाया, पोलीस अहवाल व इतर कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर संबंधिताची वर्तणूक सुधारण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस अधीक्षकांनी अंतिम हद्दपारीचा आदेश पारित केला.

आदेशानुसार संबंधिताने निर्धारित मुदतीत लातूर जिल्ह्याबाहेर जाणे बंधनकारक असून, हद्दपारीच्या कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाया भविष्यातही सातत्याने सुरू राहतील, असा निर्धार लातूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande