
परभणी, 24 जुलै (हिं.स.)। जिंतूर पोलिसांनी दरोडा व खंडणीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. एका प्रकरणात अवघ्या 24 तासांत दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेले 90 किलो सोयाबीन, चाकू व दुचाकी जप्त करण्यात आली, तर दुसर्या प्रकरणात सायबर विभागाच्या मदतीने आरोपीला हिंगोली जिल्ह्यातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2 लाख 18 हजार 500 रुपयांची रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्यादी विलास बाबुराव सावंत (रा. जगदंबा वेअरहाऊस, अकोली, ता. जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत जगदंबा वेअरहाऊस येथे सुनील उत्तमराव राठोड व कृष्णा कुंडलिक राठोड (दोघे रा. रायखेडा, ता. जिंतूर) यांनी चाकूचा धाक दाखवून खिशातील एक हजार रुपये हिसकावून घेतले तसेच वेअरहाऊसमधील सुमारे 90 किलो सोयाबीन जबरदस्तीने चोरून नेल्याचे नमूद केले होते. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या 24 तासांत अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान आरोपी कृष्णा कुंडलिक राठोड याच्याकडून सुमारे 8 हजार रुपये किमतीचे 90 किलो सोयाबीन, गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, दुसर्या प्रकरणात फिर्यादी शालन संजय हुलगुंडे (रा. कानड, ता. जिंतूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती संजय हुलगुंडे यांना धमकावून चंदू रामकिसन चव्हाण (रा. कानड, ता. जिंतूर) याने साडेतीन लाख रुपये रोख व मोबाईल जबरदस्तीने घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना जिंतूर पोलिसांनी परभणी सायबर विभागाच्या मदतीने आरोपीला हिंगोली जिल्ह्यातील सरकाळा येथून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून 2 लाख 18 हजार 500 रुपयांची रोख रक्कम व एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पहिल्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे व पोलीस अंमलदार वाटोडे यांनी, तर दुसर्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुंगाणे व पोलीस शिपाई पोले यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis