चांदूर रेल्वेत बिबट्याच्या अवयवांची तस्करी उघड; दोघांना अटक, पाच दिवसांची वनकोठडी
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात बिबट्याच्या अवयवांच्या कथित तस्करीचे प्रकरण उघडकीस आले असून, वाईल्डलाईफ क्राइम कंट्रोल ब्युरो (मुंबई) आणि स्थानिक वन विभागाने संयुक्त कारवाई करत दोघांना अटक केली आहे. आरोपींकडू
बिबट्याची हाडे, नखे, मिशा जप्त २ अटकेत : 'डब्ल्यूसीसीबी' मुंबई व वनविभागाची चांदूर रेल्वेत कारवाई


अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात बिबट्याच्या अवयवांच्या कथित तस्करीचे प्रकरण उघडकीस आले असून, वाईल्डलाईफ क्राइम कंट्रोल ब्युरो (मुंबई) आणि स्थानिक वन विभागाने संयुक्त कारवाई करत दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून बिबट्याची हाडे, नखे, मिशा तसेच चंदन लाकूड जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे वन्यजीवांच्या अवैध व्यापाराशी संबंधित मोठ्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुरण प्रल्हाद राठोड (वय ५५, रा. चिरोडी) आणि प्रकाश किसान जाधव (वय ३१, रा. पाथरगाव) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेले बिबट्याचे अवयव अवैध बाजारपेठेत विक्रीसाठी वापरले जाणार असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. तसेच चंदन लाकूडही जप्त झाल्याने वनसंपत्तीच्या अवैध तस्करीचाही समांतर तपास सुरू करण्यात आला आहे.

वन्यजीव संरक्षणाशी संबंधित विविध कायदेशीर तरतुदींनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, बिबट्यासह संरक्षित वन्यप्राण्यांच्या अवयवांना आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात मोठी मागणी असल्याचे यापूर्वीच्या कारवायांतून समोर आले आहे. त्यामुळे अशा तस्करीमागे संघटित टोळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत. चांदूर रेल्वे येथील या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीच्या मोठ्या जाळ्याचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande